लहान मुलांनाही आयकर भरावा लागेल? काय आहे नियम, घ्या सोप्या शब्दात जाणून !
मुंबई: प्रत्येकाला आपली उपजीविका भागवण्यासाठी नोकरी अथवा व्यवसाय करावा लागतो. मात्र जेव्हा आपण निश्चित मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न मिळवू लागतो, तेव्हा आपण सरकारच्या कर कक्षेत येतो. पण अशा स्थितीत प्रश्न असाही पडतो की जी मुले कमावतात, त्या मुलांनाही कर भरावा लागेल की नाही? शेवटी, यासंबंधीचे नियम काय आहेत, जे जाणून घेणे तुमच्यासाठी आवश्यक आहे. चला तर मग विलंब न लावता याबद्दल जाणून घेऊ.
मुलांबाबत कर नियम काय आहेत?
आयकर कायदा, 1961 च्या कलम 61(1A) नुसार, प्राप्तिकराच्या कक्षेत येणारे सर्व पैसे, जे अल्पवयीन मुलांकडून प्राप्त होतात त्यांना देखील कर आकारला जातो.
खालील गोष्टींवर कर आकारला जातो
★अल्पवयीनांच्या नावे केलेली गुंतवणूक.
★बचत खाते.
★मुदत ठेव.
★चित्रपट आणि जाहिरातींमध्ये काम करणाऱ्या बाल कलाकारांचे वेतन इ.
नेमका आयकर किती?
मुलांच्या उत्पन्नावर किती कर आकारला जातो याबद्दल जाणून घ्यायचे झाल्यास नियमांनुसार, 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे मूल एका महिन्यात 1500 रुपयांपेक्षा जास्त कमावत असेल तर त्यावर कर आकारला जातो. तथापि, दरमहा 1500 रुपयांपेक्षा कमी कमाईवर कर देय नाही.
या गोष्टी जाणून घ्या
मुलांच्या नावावर विविध प्रकारच्या गुंतवणुकीतून मिळणारे उत्पन्न किंवा त्यांचा पगार इत्यादी मुलांच्या पालकांच्या उत्पन्नात जोडले जातात. यानंतर, निर्धारित कर स्लॅबनुसार पालकांच्या एकूण उत्पन्नावर आयकर आकारला जातो.
मुलाचे आई-वडील घटस्फोटित असतील तर कमावते कोण, याचा विचार केला जाईल. त्यामुळे कायद्याने मूल ज्या पालकाच्या ताब्यात असेल, त्या पालकांच्या उत्पन्नात मुलाचे उत्पन्न जोडून त्यावर कर आकारला जाईल.