जाणून घ्या, कोणकोणत्या उत्पन्नावर कर आकारला जात नाही
मुंबई : प्रत्येक मूल्यांकन वर्षात प्राप्तिकर रिटर्न भरण्याची तारीख जसजशी जवळ येत तसतसे करदात्यांची एकच दमछाक होते. प्रत्येक आर्थिक वर्षात एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या लोकांना आयकर विवरणपत्र भरावे लागते. त्यामुळे जर तुम्ही सरकारने ठरवून दिलेल्या करपात्र उत्पन्नाच्या कक्षेत येत असाल तर तुम्हाला कर भरणे बंधनकारक आहे मात्र, करदात्यांना विविध सवलती देखील मिळतात. त्याचवेळी उत्पन्नाचे अनेक प्रकार आहेत ज्यावर कोणताही कर भरावा लागत नाही.
शेतीतून मिळालेले उत्पन्न
देशातील कृषी क्षेत्राची स्थिती सुधारण्यासाठी शेतीतून मिळणारे उत्पन्न आयकराच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आले आहे. मात्र, जर शेतकऱ्याचे उत्पन्न शेतीव्यतिरिक्त अन्य स्रोतातून येत असेल, तर ते कराच्या कक्षेत आणण्यासाठी विचारात घेतले जाते. याबाबतीत शेतीव्यतिरिक्त इतर स्त्रोतांकडून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर आकारला जातो.
दीर्घकालीन भांडवली नफा
सध्या इक्विटी शेअर्स आणि इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंडांच्या विक्रीतून मिळणारे उत्पन्न देखील आर्थिक वर्षात कर कक्षेत नाही. पण दीर्घकालीन भांडवली नफ्याची रक्कम १ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावी. जर तुम्ही शेअर किंवा म्युच्युअल फंडात एक ते तीन वर्षांसाठी गुंतवणूक केली आणि त्यातून मिळणारा नफा त्याला दीर्घकालीन भांडवली नफा असे म्हणतात.
भविष्य निर्वाह निधी
भविष्य निर्वाह निधीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी या फंडातून पैसे काढले तर त्यांना कोणत्याही प्रकारचा कर भरावा लागणार नाही. मात्र, त्यासाठी काही अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. जर तुम्ही पाच वर्षापूर्वी पीएफमधून पैसे काढले तर तुम्हाला कर भरावा लागेल. पाच वर्षांच्या सेवेनंतर पैसे काढणे करपात्र नाही.
ग्रॅच्युइटीतून कमाई
एकाच कंपनीशी दीर्घकाळ संबंधित राहिल्यामुळे कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी मिळते. सध्याच्या नियमांनुसार संपूर्ण कारकीर्दीत २० लाख रुपयांपर्यंतच्या ग्रॅच्युइटीच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही. त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारी ग्रॅच्युइटीची रक्कम पूर्णपणे करमुक्त असते.