तब्बल एक हजार भारतीय बेरोजगार चीनच्या सायबर गुलामगिरीचे शिकार

तब्बल एक हजार भारतीय बेरोजगार चीनच्या सायबर गुलामगिरीचे शिकार

नवी दिल्ली: परदेशात नोकरीच्या शोधात असलेल्या तब्बल एक हजार भारतीय युवकांना फसवून म्यानमारमध्ये गुलाम बनवून ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. सायबर स्लेव्हिंगच्या या नवीन प्रकाराने एकच खळबळ उडाली असून जगभरातील अंदाजे दहा हजार तरुण तिथे मानवी तस्करीला बळी पडल्याचे समोर आले आहे.
चीनच्या काही कंपन्यांनी म्यानमारमधील यंगुनजवळ एक छोटे शहर वसवले आहे. या कंपन्यांनी अनेक देशात आपले एजंट पेरले आहेत. परदेशात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना शोधून त्यांना फसवून प्रथम त्यांना थायलंड मध्ये नेले जाते. बँकॉक विमानतळावर उतरल्यानंतर त्यांना एका बस मधून जंगलामधून 600 किमी दूर म्यानमारमधील या ठिकाणी नेले जाते. तिथे गेल्यानंतर आपण फसवले गेलो आहोत हे त्या युवकांच्या लक्षात येते. दुसऱ्या दिवसापासून त्यांना सायबर फसवणुकीच्या कामाला जुंपले जाते. अशी एकंदरीत या प्रकरणात गुंतलेल्या चायनीज कंपन्यांची मोडस ऑपरेंडी असल्याचे समोर आले आहे. काम न करणाऱ्या तरुणांना जेलमध्ये टाकले जात असून त्यांना मारून त्यांचे अवयव काढून ते विकण्याची धमकी देण्यात येत आहे.
डेटिंग अॅपद्वारे लोकांना अडकवण्याचे काम

एका पिडीत युवकाच्या म्हणण्यानुसार, तिथे गेल्यावर त्याचा एक मुलीच्या नावे फेक आयडी तयार करून फेसबुक आणि इंस्टाग्राम प्रोफाईल तयार करण्यात आली होती. एका डेटिंग अॅपच्या माध्यमातून त्याला युरोपमधील चाळीशीच्या पुढील वयाच्या लोकांना अडकवण्याचे काम देण्यात आले होते. यापैकी बहुतेकांच्या बँक खात्यात प्रचंड पैसा होता. सोशल मीडिया अकाउंट हॅक करून त्यांचा तपशील काढण्यात आला होता. एकदा टार्गेट जाळ्यात अडकले की त्याला क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे जमा करण्यास सांगण्यात येते. पैसे जमा होताच सर्व सोशल मीडिया अकाउंट डिलीट करण्यात येतात.
परदेशात नोकरीच्या शोधात असलेल्या भोळ्या भारतीय तरुणांना सावध करण्यासाठी, यंगूनमधील भारतीय दूतावासाने 36 मोस्ट वॉन्टेड मानवी तस्कर आणि त्यांच्या कंपन्यांची यादी जारी केली आहे. म्यानमारमधील या सायबर फसवणूक कारखान्यांमध्ये आयटी कुशल लोकांना अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. संशयित एजंट, एजन्सी आणि कंपन्यांची यादी पीडितांनी सामायिक केलेल्या इनपुटच्या आधारे तयार केली गेली आहे, ज्यांना म्यानमारमधील म्यवाडी येथे कामासाठी बेकायदेशीरपणे आणले गेले आहे.
या यादीत चिनी कंपन्यांसह त्यांच्या एजंटांच्या नावांचा समावेश आहे.
मोस्ट वॉन्टेड लिस्टमध्ये परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) 10 एजन्सींची नावे, 10 चीनी कंपन्यांची नावे आणि 16 एजंट्सची नावे आणि त्यांचे संपर्क क्रमांक ते जिथे काम करतात त्या ठिकाणासह जारी केले आहेत. नवी दिल्ली, हैदराबाद, गुडुवनचेरी, तेलंगणा, तिरुवनंतपुरम, अल्लापुझा, मुंबई, अलप्पुझा, चेन्नई, विशाखापट्टणम, पाटणाजवळील सिवान आणि दिडवाना यासह देशातील विविध भागांतून भारतीय मानवी तस्कर त्यांच्या चिनी गॉड फादर सोबत काम करत आहेत.
यांगूनमधील भारतीय दूतावासाने सांगितले की, “या कंपन्या त्यांच्या एजंट मार्फत भारतीय तरुणांचीही भरती करत आहेत, ज्यांचा वापर प्रामुख्याने व्हिसासाठी प्रायोजित करण्यासाठी केला जातो. दूतावासाने काही कंपन्या आणि एजंटची यादी जाहीर केली असली तरी या कंपन्या वारंवार त्यांचे नाव आणि स्थान बदलून आयटी कुशल नोकरी शोधणार्‍यांना फसवण्याचे उदद्योग सुरूच ठेवू शकतात असेही दूतावासाने म्हटले आहे.

18 तास काम करण्यास भाग पाडले
मानवी तस्करांच्या आंतरराष्ट्रीय टोळीने युवकांना डिजिटल सेल्स आणि मार्केटिंग एक्झिक्युटिव्हच्या पदांचे आमिष दाखवले. त्यानंतर त्यांना व्हिजिट व्हिसावर बँकॉकला जाण्यास सांगण्यात आले. एकदा ते थायलंडमध्ये उतरल्यानंतर, पीडितांना खोट्या नोकऱ्या देणाऱ्या आणि सायबर स्लेव्हिंग करणाऱ्यांच्या खाजगी सैन्याच्या देखरेखीत म्यानमारला नेऊन चिनी ओलिसांनी कामगारांना सतत कामावर जुंपत त्यांना योग्य विश्रांतीही घेऊ दिली नाही. त्यांना दिवसाचे सुमारे 18 तास काम करावे लागले.
प्रत्येक पीडिताला तेथे रोजचे तसेच मासिक टार्गेट देऊन ते पूर्ण न केल्यास त्यांच्यावर विजेचा धक्का, लाठीचार्ज, त्यांच्या शरीरात लोखंडी सळ्या मारणे इत्यादी क्रूर अत्याचार केले जात आहेत.
काही प्रकरणांमध्ये पीडितांना 24 तास अन्न आणि विश्रांतीशिवाय वॉटर जेलमध्ये ठेवले जाते. हे लोकं त्यांच्या भारतातील रॅकेटच्या मदतीने फेसबुक, इंस्टाग्राम आणि टेलिग्रामसह सोशल मीडियावर आयटी कुशल तरुणांना लक्ष्य करत आहेत.
त्यांच्याकडून देण्यात येणाऱ्या ऑफर अतिशय किफायतशीर असल्याने परदेशात नोकरी शोधणारे युवक या बनावट ऑफरला भुलून अलगद त्यांच्या जाळ्यात अडकतात. यात आणखी अनेक प्रकरण उघडकीस येण्याची शक्यता आहे.

CATEGORIES
Share This