आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्यांना यंदा कोट्यावधींची पॅकेजेस!
मुंबई: सध्या आयआयटी बॉम्बेच्या कॅम्पस प्लेसमेंटचा कार्यक्रम सुरू असून प्लेसमेंटच्या पहिल्या फेजमध्ये यंदा बंपर नोकऱ्या मिळाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात 293 कंपन्यांनी 1431 विध्यार्थ्यांना नौकरीच्या ऑफर दिल्या आहेत. कंपन्यांनी यंदा इंटरनॅशनलमध्ये सर्वाधिक 3.67 कोटी तर डोमेस्टिकसाठी 1.31 कोटी रुपयांचे वार्षिक पॅकेज दिले.
आयआयटी बॉम्बेच्या विध्यार्थ्यांना गतवर्षी झालेल्या प्लेसमेंटच्या तुलनेत यंदाच्या फेजमध्ये 3.55 टक्के अधिक नोकऱ्या मिळाल्या आहेत. गेल्या वर्षी 1382 व 2021-22 मध्ये फक्त 973 नोकऱ्या मिळाल्या होत्या. यंदा विद्यार्थ्यांना सरासरी 23.26 लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळाले. पीएचडी प्राप्त स्कॉलर्सना सर्वाधिक 36 नोकऱ्या मिळाल्या. यामध्ये सर्वाधिक पॅकेज 29 लाखांचे होते. पीएचडीधारकांना सरासरी 16 लाखांचे पॅकेज मिळाले. गतवर्षीच्या तुलनेत या वेळी वित्त, संशोधन व विकास क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या पगारात घसघशीत वाढ झाली.
क्षेत्रनिहाय सरासरी मिळालेले पॅकेज
इंजिनिअरिंग व टेक्नॉलॉजी 21.20 लाख रु. आयटी/सॉफ्टवेअर 24.31 लाख रु. फायनान्स 41.66 लाख रु. संशोधन आणि विकास 32.25 लाख रु. कन्सल्टिंग 17.27 लाख रु.
यंदा 65% विद्यार्थ्यांनी स्वीकारल्या प्री-प्लेसमेंट ऑफर!
यंदा 300 प्री-प्लेसमेंट ऑफर प्राप्त झाल्या. पैकी 194 विद्यार्थ्यांनी स्वीकारल्या. गेल्या वर्षी कंपन्यांनी 248 प्री-प्लेसमेंट ऑफर दिल्या होत्या. पैकी 202 विद्यार्थ्यांनी स्वीकारल्या होत्या.