आता ई-कॉमर्स कंपन्यांना ऑनलाइन फेक रिव्ह्यू दाखवणे पडेल महागात;
सरकारने बनावट रिव्ह्यूसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे केली लागू.
नवी दिल्ली: ई-कॉमर्स वेबसाइट्सवरील बनावट रिव्ह्यूंबाबत सरकारने आता कडक धोरण अवलंबले आहे. बनावट पुनरावलोकने रोखण्यासाठी सरकारकडून आता नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यात आली आहेत.
भारतीय मानक ब्युरो (BIS) ने जारी केलेली ऑनलाइन पुनरावलोकन मार्गदर्शक तत्त्वे आता लागू झाली आहेत. नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ऑनलाइन ई-कॉमर्स कंपन्यांना त्यांच्या वेबसाइटवरील कोणत्याही उत्पादनाचे ऑनलाइन पुनरावलोकन वास्तविक आहे आणि रेटिंग देखील योग्य आहे याची पुष्टी करावी लागेल.
सरकारच्या या प्रयत्नाकडे ऑनलाइन बनावट पुनरावलोकने थांबवण्याचा एक मार्ग म्हणून पाहिले जात आहे. जेव्हापासून ऑनलाइन खरेदीचा कल वाढला आहे, तेव्हापासून वस्तू खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येने ग्राहकांच्या मतावर प्रभाव टाकण्यासाठी ऑनलाइन शॉपिंग कंपन्यांकडून बनावट पुनरावलोकनांची प्रणाली चालविली जात आहे.
या कंपन्यांचा होईल फायदा
चांगली सेवा आणि उत्पादने विकणाऱ्या कंपन्यांना सरकारच्या या मार्गदर्शक तत्त्वांचा फायदा होईल. त्याचबरोबर ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे सरकारने सर्व पक्षांशी बोलून ही मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. सध्या तरी हे अनिवार्य केले नसून सरकारने कंपन्यांना स्वतःहून अशी बनावट रिव्हीव काढून टाकण्यास सांगितले आहे. कंपन्यांनी त्याप्रमाणे स्वतःहून सुधारणा न केल्यास मात्र हे अनिवार्य करण्यात येणार आहे.