एसबीआयच्या पहिल्याच इन्फ्रास्ट्रक्चर बाँडला मिळाला जोरदार प्रतिसाद; गुंतवणुकदारांना मिळेल इतका फायदा.
मुंबई: एसबीआयने पायाभूत सुविधा बाँड जारी करून 10,000 कोटी रुपये उभे केले आहे. बँक या रोख्यांचे पैसे पायाभूत सुविधा आणि परवडणाऱ्या किंवा बजेट घरांसाठी निधी म्हणून वापर करील.
देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) द्वारे जारी केलेल्या पहिल्या पायाभूत सुविधा बाँडला गुंतवणूकदारांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. शुक्रवारी या रोख्यांच्या माध्यमातून 10,000 कोटी रुपयांचा निधी उभारण्यात एसबीआयला यश आले आहे. देशातील कोणत्याही बँकेने एकाच वेळी इन्फ्रा बाँडद्वारे एवढी मोठी रक्कम उभारण्याची ही पहिलीच वेळ आहे.
बँकेकडून अशी माहिती देण्यात आली आहे की, पुढील 10 वर्षांसाठी जारी करण्यात आलेल्या या रोख्यांमधून मिळणारा पैसा बँकेने पायाभूत सुविधा आणि परवडणाऱ्या घरांसाठी दिलेल्या कर्जासाठी वापरला जाईल. बँकेने सांगितले की, 143 बोलींच्या आधारे, इन्फ्रा बॉण्डला 16,366 कोटी रुपयांचे सबस्क्रिप्शन मिळाले यावरून गुंतवणूकदारांचा बँकेवरचा विश्वास दिसून येतो.
गुंतवणूकदारांना मिळेल ७.५१ टक्के दराने व्याज
10,000 कोटी रुपयांच्या इन्फ्रा बाँड्सवर 7.51 टक्के दराने व्याज दिले जाईल आणि 10 वर्षांच्या कालावधीसाठी या बाँड्सवर हा लाभ दिला जाईल, अशी माहिती बँकेने दिली. हा बाँड समान सरकारी सिक्युरिटीजपेक्षा 17 बेसिस पॉईंट जास्त उत्पन्नावर ऑफर केला जातो, जो उच्च दर्जाचा संकेत देतो.
पायाभूत सुविधा प्रकल्पांना निधी देण्यासाठी मदत होईल
बाँड विक्रीवर भाष्य करताना एसबीआयचे अध्यक्ष दिनेश खारा म्हणाले की, पायाभूत सुविधा विकसित करणे ही देशाची पहिली प्राथमिकता आहे आणि बँक देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असल्याने सामाजिक, हरित आणि पायाभूत प्रकल्पांना निधी पुरवण्यात आघाडीवर असेल.
SBI द्वारे जारी केलेल्या इन्फ्रा बाँड्सना देशांतर्गत क्रेडिट रेटिंग एजन्सीद्वारे AAA- रेटिंग दिले गेले आहे, जे अशा बाँडची उच्च गुणवत्ता दर्शवतात.