या बँका देत आहेत बचत खात्यावर एफडी सारखे व्याज दर !
मुंबई: भारतातील मोठ्या संख्येने लोक त्यांच्या दैनंदिन आणि आपत्कालीन निधीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बचत खात्यांमध्ये पैसे ठेवतात. यामुळे लोकांना बचत खात्यावर एफडीवरील व्याजाच्या तुलनेत 3 ते 4 टक्के कमी व्याज मिळते. त्याच वेळी, अशा काही बँका त्यांच्या खातेधारकांना त्यांच्या बचत खात्यांवर एफडी सारखे व्याज दर देखील देत आहेत, ज्याबद्दल आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.
आरबीआयने महागाई नियंत्रित करण्यासाठी गेल्या पाच महिन्यांत चार वेळा व्याजदरात वाढ केली. त्यामुळे सर्व बँकांकडून सर्व प्रकारच्या खात्यांवर व्याजदर वाढवले जात आहेत. असे असले तरी बचत खाते आणि फिक्सड डिपॉझिट यांची तुलना करता अनेक मोठ्या बँका बचत खात्यावरील रकमेला कमी व्याज देतात. मात्र काही बँका बचत खात्यावर देखील एफडी प्रमाणे व्याज देत असल्याचे दिसून येते.
या बँका देतात 6.55 ते 7 टक्के व्याज.
या बँकांमध्ये एयू स्मॉल फायनान्स बँक, इक्विटास स्मॉल फायनान्स बँक, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक, डीसीबी बँक, बंधन बँक, आईडीएफसी फर्स्ट बँक, आरबीएल बँक आणि येस बँक यांचा समावेश आहे.
स्मॉल फायनान्स बँक
लघु वित्त बँकांकडून खातेदारांना सर्वाधिक व्याज दिले जात आहे. एयू स्मॉल फायनान्स बँक आपल्या बचत खातेधारकांना 7 टक्के, इक्विटास स्मॉल फायनान्स बँक 3.5 ते 7 टक्के, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक 3.5 ते 7 टक्के, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक 4 ते 6.25 टक्के व्याज देत आहे.
खाजगी बँका
लघु वित्त बँकांनंतर खाजगी बँका त्यांच्या बचत खातेधारकांना सर्वाधिक व्याज देऊ करत आहेत. डीसीबी बँकेकडून गुंतवणूकदारांना 2.25 टक्के ते 7 टक्के व्याज दिले जात आहे. यानंतर बंधन बँक 3 ते 6.5 टक्के, आयडीएफसी फर्स्ट बँक किमान 4 टक्के आणि कमाल 6.25 टक्के, आरबीएल बँक आणि येस बँक कमाल 6.25 टक्के व्याजदर देत आहेत.
आरबीआयने वाढवले व्याजदर
आरबीआयने व्याजदरात वाढ केल्यानंतर सर्व बँका व्याजदरात वाढ करत आहेत. आरबीआयने गेल्या पाच महिन्यांत 190 बेसिस पॉईंट्सने किंवा 1.90 टक्क्यांनी व्याजदर वाढवत ते 5.90 टक्क्यांवर आणले. त्यानंतर सर्व बँका व्याजदर वाढवत आहेत.