रुपयातील अस्थिरतेवर रिझव्र्ह बँकेचे लक्ष
नवी दिल्ली : अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे मूल्य कोणत्या पातळीवर स्थिर व्हावे हे निश्चित केलेले नसले तरी डॉलरच्या तुलनेत त्यात मोठी पडझड होऊ नये यासाठी आमचे लक्ष असल्याचे रिझव्र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर मायकेल पात्रा यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
जागतिक पातळीवर आथिर परिस्थिती असतानादेखील अमेरिकी डॉलरच्या तुलनेत गेल्या काही काळात रुपयाचे कमीत कमी अवमूल्यन झाल्याचे पात्रा म्हणाले. सध्या रुपया कुठल्या पातळीवर स्थिरावेल हे सांगणे कठीण असून अमेरिकी मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल रिझव्र्हलादेखील डॉलरच्या पातळीबद्दल कोणताही अंदाज आलेला नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. असे असले तरी रुपयाच्या स्थिरतेसाठी आमचे प्रयत्न कायम आहेत. चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया कोणत्या पातळीवर स्थिर व्हावा हे निश्चित केले नसले तरी रुपयातील मोठी घसरण मध्यवर्ती बँकेला अमान्यच असेल, अशी भूमिका त्यांनी मांडली. ते पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने आयोजित ‘भूराजकीय चढ-उतार आणि भारतीय अर्थव्यवस्था’ या विषयावरील चर्चासत्रात बोलत होते. श्री पात्रा म्हणाले, इतर देशांच्या तुलनेत रुपयाचे कमी अवमूल्यन झाले असून देशाकडे सध्या ६०० अब्ज डॉलरची परकीय गंगाजळी आहे. सद्यस्थितीत बाजारात रुपयाची नीचांकी घसरण कायम असून शुक्रवारच्या सत्रात रुपया ७८.३३ या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर स्थिरावला. आंतरबँक परकीय चलन बाजारात रुपयाने ७८.२० पासून व्यवहारास सुरुवात केली. दिवसअखेरीस १ पैशांची तूट दर्शवत रुपयाचे मूल्य प्रति डॉलर ७८.३३ या नीचांकपदी जाऊन स्थिरावले. दिवसभरातील सत्रात रुपयाने ७८.१९ रुपयांची उच्चांकी तर ७८.३५ या दिवसभरातील नीचांकी पातळीला स्पर्श केला.
चौथ्या तिमाहीत महागाई आटोक्यात
रिझव्र्ह बँकेचे व्याजदर वाढीचे धोरण जगातील इतर देशांच्या मध्यवर्ती बँकांनी अंगीकारलेल्या आक्रमकतेच्या तुलनेत नरमाईचे असेल. तसेच जानेवारी ते मार्च २०२३ या तिमाहीत महागाई दर ६ टक्क्यांच्या खाली येईल, असा विश्वास पात्रा यांनी व्यक्त केला. रिझव्र्ह बँकेकडून करण्यात येत असलेल्या धोरणात्मक उपाययोजनांमुळे महागाई लवकर आणि वेगाने कमी होईल. चालू आर्थिक वर्षांच्या चौथ्या तिमाहीत महागाई दर रिझव्र्ह बँकेने निर्धारित केलेल्या मर्यादेच्या आत येईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.