Share Market Crash: बाजार धडामधूम! गुंतवणूकदारांना 8 लाख कोटींचा फटका.
मुंबई: जगभरातील विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून व्याजदरात सातत्याने होणारी वाढ, जागतिक स्तरावर मंदीची संभाव्य भीती आणि चीन-जपानसह जगातील अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढल्याचा एकूण परिणाम शेअर बाजारावर झाला. त्यामुळे मागील सात व्यवहारांच्या दिवसात 6 वेळा शेअर बाजार कोसळला. परिणामी गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 19 लाख कोटी रुपयांची मोठी घट झाली आहे.
गेल्या सात दिवसांची कामगिरी पाहिली तर विशेषत: 14 डिसेंबरपासून बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप विक्रमी उच्चांकावर होते. तेव्हापासून आतापर्यंत मार्केट कॅप सुमारे 18.96 लाख कोटींनी कमी झाले आहे. मागील सात व्यवहारांच्या दिवसात 6 वेळा शेअर बाजार कोसळला असून यामुळे गेल्या 7 दिवसांत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 19 लाख कोटी रुपयांची मोठी घट झाली.
गुंतवणूकदारांचे 8.25 लाख कोटी बुडाले.
शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या भांडवलात शुक्रवारी 23 डिसेंबर रोजी सुमारे 8.26 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. बीएसईवर सूचीबद्ध असलेल्या सर्व कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 272.19 कोटी रुपयांवर आले आहे. एक दिवस आधी म्हणजेच गुरुवारी २२ डिसेंबर रोजी बाजार भांडवल 280.55 लाख कोटी होते.
सेन्सेक्सचे सर्व शेअर्स घसरले.
सेन्सेक्सच्या 30 पैकी फक्त टायटनचा शेअर्स आज वाढीसह बंद झाला. टाटा समूहाचा हा शेअर मुंबई शेअर बाजारावर ०.२३ टक्क्यांच्या वाढीसह 2488.75रुपयांवर बंद झाला. सेन्सेक्समधील उर्वरित 29 शेअर्स घसरणीसह बंद झाले. टाटा स्टील, टाटा मोटर्स, स्टेट बँक ऑफ इंडिया, बजाज फिनसर्व्ह आणि विप्रो या प्रमुख 5 शेअर्सचा घसरणीमध्ये समावेश आहे. हे सर्व शेअर्स 2.80 ते 4.97 टक्क्यांपर्यंत घसरून बंद झाले. सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरून बंद झाले. निफ्टी पीएसयू बँक सर्वाधिक 6.06 टक्क्यांनी घसरला. निफ्टी फार्मामध्ये केवळ 0.84 टक्के घसरण दिसून आली. बीएसई मिडकॅप निर्देशांक 3.4 टक्क्यांनी तर स्मॉलकॅप निर्देशांक 4 टक्क्यांपर्यंत घसरला.
कोणत्या शेअर्समध्ये अप्पर सर्किट
बीएसईवर एकूण 3655 कंपन्यांचे व्यवहार झाले 482 शेअर्स वधारून आणि 3106 शेअर्स घसरले. 67 कंपन्यांच्या शेअरच्या किमतीत कोणताही फरक पडला नाही. 64 शेअर्स 52 आठवड्यांच्या सर्वकालीन उच्चांकावर तर 294 शेअर्स नीचांकी पातळीवर बंद झाले. याशिवाय 122 शेअर्समध्ये अप्पर सर्किट आणि 411 शेअर्समध्ये लोअर सर्किट लागले.
निफ्टी फिफ्टी मध्ये घसरण
आज निफ्टी जवळपास पावणेदोन टक्क्यांनी घसरला. निफ्टी फिफ्टी मधील केवळ डिव्हीस लॅब आणि टायटन हे दोन स्टॉक वगळता इतर सर्व स्टॉक निगेटिव्ह मध्ये बंद झाले. पैकी अदानी पोर्ट, अदानी एंटरप्राइजेस, हिंदाल्को, टाटा स्टील हे पाच स्टोक पाच टक्क्यांपेक्षा जास्त घसरले. सेक्टरचा विचार केल्यास सर्व्हिस सेक्टर 5.29 टक्के, इंजिनिअरिंग 4.19 टक्के, मेंटल्स आणि माईन्स 3.55 टक्के तर निफ्टी फिफ्टी मध्ये सर्वाधिक वेटेज असलेले बँकिंग 1.52 टक्के, टेक्नॉलॉजी 1.33 टक्के, ऑइल अँड गॅस 2.75 टक्के तर ऑटोमोटिव्ह 2.35 टक्के तुटले.