इलेक्शन की सलेक्शन?
काँग्रेस पक्षाशी संबंधित एक घटना 1946 सालातील. म्हणाल तर जुनी परंतु आताच्या परिस्थितीत देखील तोच कित्ता गिरवणारी. देश स्वतंत्र होणार होता आणि काँग्रेसचे जे अध्यक्ष असतील तेच देशाचे पहिले पंतप्रधान होणार हे निश्चित झाले होते. काँग्रेसच्या 15 पैकी 12 राज्य समित्या सरदार पटेल यांना अध्यक्ष म्हणून निवडण्याच्या बाजूने होत्या. मात्र महात्मा गांधींच्या सांगण्यावरून पटेल यांनी शर्यतीतून माघार घेतली आणि जवाहरलाल नेहरू अध्यक्ष झाले. हा किस्सा काँग्रेस अध्यक्षांशी संबंधित सर्वात वादग्रस्त आणि चर्चित मुद्द्यांपैकी एक आहे. देशातील सर्वात जुन्या पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक हा नेहमीच राजकारण आणि वादांचा मुद्दा राहिला आहे. त्याचे कारण म्हणजे इंदिरा गांधी यांच्या काळापासून काँग्रेस पक्षाच्या कार्यकारणी आणि इतर महत्वाच्या जागी गांधी नामाचा जप करणाऱ्या मंडळींची वर्णी कशी लागेल हेच पाहिले गेले. 1967 च्या कॉग्रेस फुटीत इंदिराजींनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्याच रिकविझेशन-सिंडिकेट गटाच्या नीलम संजीव रेड्डी यांना पाडून स्वतःच्या इंदिरा गटाचे व.वे. गिरी यांना राष्ट्रपती म्हणून निवडून आणले. काँग्रेस मध्ये एक तर गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष केला जात नाही अन केलाच तर तो निव्वळ “होणाजीराव” असतो. राजकीय परिभाषेत त्याला एकनिष्ठ, मर्जीतील, कट्टर काँग्रेसनिष्ठ अशी सोयीनुसार विशेषणे तयार केलेली आहेतच. गेल्या 24 वर्षात इनमिन तीन वेळेस काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत निवडणुका झाल्या, तिन्ही वेळेस त्या वादग्रस्त ठरल्या. तरीही त्या प्रक्रियेला लोकशाही प्रक्रियेचे गोंडस नाव दिले जाते हाच मुळी विनोदाचा विषय ! 1998 साली सोनियांच्या विरोधात सीताराम केसरी निवडणूक लढवणार असल्याची कुणकुण कथित एकनिष्ठांना लागली अन त्यांनी केसरींना टॉयलेट मधेच कोंडून टाकले. मुखर्जींच्या घरी जेव्हा सोनिया अध्यक्ष झाल्याची घोषणा करण्यात आली तेव्हाच केसरींची सुटका झाली. दोन वर्षांनी जितेंद्र प्रसादानी जेव्हा अचानक निवडणूक लढवण्याची घोषणा केली तेव्हा त्यांनाही यूपीतील तथाकथित एकनिष्ठांनी असेच सळो की पळो करून सोडले. पुढे राहुल गांधी यांच्या विरोधात शहजाद पुनावाला यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा त्यांना तर इतका त्रास देण्यात आला की गांधी कुटुंबाने त्यांच्याशी नातेसंबंध सुद्धा तोडून टाकले. यावेळी सुरुवातीला राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे नाव निश्चित झाले. त्यांनी स्थानिक राजकारणापायी थोडा स्वाभिमानी बाणा कायम ठेवला म्हणून त्यांचे नावच वगळण्यात आले. त्याच वेळी शशी थरूर अध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याचे त्यांनी जाहीर केले. ईतकी वर्ष काँग्रेसमध्ये घालवलेल्या थरूर यांच्या नावाला गांधी घराण्याने मग का हिरवा कंदील दाखवला नाही ? ते स्वाभिमानी जी-23 गटाचे होते म्हणूनच त्यांना वगळण्यात आले हे निश्चित आहे. थोडक्यात काय तर हे इलेक्शन नसून सलेक्शन आहे. म्हणजे गांधी घराण्याने एखादा खर्गे सारखा उमेदवार अध्यक्ष पदासाठी द्यायचा अन मर्जीतील सदस्यांनी त्याची झिल ओढायची, याला जर लोकशाही म्हणत असतील तर लोकशाहीवर देखील आणखी संशोधन होण्याची गरज आहे.