युक्रेन युद्धात आता रशियाच्या विध्वंसक सरमत क्षेपणास्त्राची चर्चा; जाणून घ्या काय आहेत त्याची वैशिष्ट्ये !
नवी दिल्ली: युक्रेन युद्धात आता रशियाचे सरमत क्षेपणास्त्र विशेष चर्चेत आले आहे. हे रशियन क्षेपणास्त्र एकाच वेळी 15 ठिकाणी अण्वस्त्र हल्ले करण्यास सक्षम आहे. Roscosmos ची एकूण 46 सरमत क्षेपणास्त्रे तयार करण्याची योजना आहे. या क्षेपणास्त्राची रचना रशियन कंपनी मेकेयेव रॉकेट डिझाईन ब्युरोने केली आहे.
रशिया-युक्रेन युद्ध आता नव्या वळणावर पोहोचले आहे. युक्रेनवरून रशिया आणि नाटो यांच्यातील तणाव वाढत चालला आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अण्वस्त्र हल्ल्याचा इशारा दिल्यानंतर नाटोची भूमिका घट्ट झाली आहे. रशियाकडे एक इंचही जमीन राहू देणार नाही, असे नाटो संघटनेचे म्हणणे आहे. त्यासाठी त्यांची कोणत्याही थराला जाण्याची तयारी आहे. अशा स्थितीत या युद्धाची वाटचाल अणुयुद्धाकडे होत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नाटो आणि मॉस्को यांच्यातील तणावादरम्यान रशियामध्ये सरमत क्षेपणास्त्रांची चर्चा तीव्र होत आहे. रशिया खरोखरच अणुयुद्धाची तयारी करत आहे का? सरमत क्षेपणास्त्र म्हणजे काय? या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची क्षमता किती आहे. याविषयी जाणून घेऊ .
सरमत क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये
◆ रशियाचे सरमत हे आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे. हे 15,880 mph वेगाने लक्ष्य नष्ट करण्यास सक्षम आहे. हे जगातील सर्वात वजनदार क्षेपणास्त्रांपैकी एक आहे. या क्षेपणास्त्रात ब्रिटन आणि फ्रान्ससारख्या बलाढ्य देशांना एकाच हल्ल्यात नष्ट करण्याची क्षमता आहे. सरमत क्षेपणास्त्राची लांबी 115 फूट आहे. हे क्षेपणास्त्र एकाच वेळी 15 ठिकाणी अण्वस्त्र हल्ले करण्यास सक्षम आहे. Roscosmos ची एकूण 46 सरमत क्षेपणास्त्रे तयार करण्याची योजना आहे. या क्षेपणास्त्राची रचना रशियन कंपनी मेकेयेव रॉकेट डिझाईन ब्युरोने केली आहे.
◆ सरमत क्षेपणास्त्राच्या आत 10 ते 15 वॉरहेड्स आहेत, जे दुसऱ्या टप्प्यात वेग-वेगळ्या ठिकाणांना लक्ष्य करू शकतात. या रशियन क्षेपणास्त्राची 2009 पासून चाचणी सुरू आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी ही क्षेपणास्त्रे अजिंक्य असल्याचे म्हटले आहे. यामध्ये रशियन किंजल आणि अवानगार्ड हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. पाच ते सहा रशियन सरमत क्षेपणास्त्रे अमेरिकेच्या संपूर्ण पूर्व किनारपट्टीला राखेचा ढिगारा बनवू शकतात, यावरून त्याची विध्वंसक कल्पना येऊ शकते. रशियाने 2017 मध्ये या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी केली होती. त्यावेळी हे पृथ्वीवरील सर्वात धोकादायक आणि प्राणघातक आण्विक क्षेपणास्त्र ठरले होते. रशियाकडे जी सहा सुपर-डिस्ट्रॉयर क्षेपणास्त्रे आहेत त्यात विध्वंसक सरमत क्षेपणास्त्राचा समावेश आहे.