भारतीय हवामान विभागात 990 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू.
नवी दिल्ली: कर्मचारी निवड आयोगाने हवामान विभागातील वैज्ञानिक सहाय्यक पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. उमेदवार 18 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करू शकतात. अर्जासाठीची पात्रता संबंधित विषयातील पदवी किंवा डिप्लोमा आहे.
हवामान खात्यात सरकारी नोकरी शोधणाऱ्या इच्छुकांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनने भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत भारत हवामान विभागामध्ये 990 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. आयोगाने 30 सप्टेंबर 2022 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, IMD मध्ये सुमारे 990 वैज्ञानिक सहाय्यक पदांच्या भरतीसाठी परीक्षा घेतली जाणार आहे. आयोगाने अधिसूचना जारी केल्यानंतर अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवार प्रथम नोंदणी करून आणि नंतर एसएससीच्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर लॉग इन करून, रु. 100/ भरून त्यांचे अर्ज सबमिट करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 ऑक्टोबर आहे.
भरतीसाठी पात्रता निकष
हवामान विभागातील वैज्ञानिक सहाय्यक पदाच्या भरतीसाठी केवळ तेच उमेदवार अर्ज करू शकतात, ज्यांनी विज्ञान विषयात (भौतिकशास्त्र विषयासह) किंवा कॉम्पुटर सायन्स किंवा माहिती तंत्रज्ञान किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून कॉम्पुटर ऍप्लिकेशन मध्ये डिग्री पूर्ण केलेली असावी. इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा असलेले उमेदवारही अर्ज करू शकतात. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2022 रोजी उमेदवारांचे वय 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. तथापि, केंद्र सरकारच्या नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादेत शिथिलता देण्याची तरतूद आहे.
भरतीसाठी निवड प्रक्रिया
हवामान खात्यातील वैज्ञानिक सहाय्यक पदाच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांच्या निवडीसाठी SSC द्वारे अनुसरण करण्यात येणाऱ्या प्रक्रियेमध्ये संगणक आधारित परीक्षा (CBE) आणि दस्तऐवज पडताळणी यांचा समावेश होतो. परीक्षा 2 तासांची असेल, तिचे दोन भाग असतील. भाग १ मध्ये जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड, इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन आणि जनरल अवेअरनेस मधील २५ प्रश्न आणि भाग २ मध्ये संबंधित विषयातील १०० प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नासाठी 1 गुण दिलेला आहे. परीक्षेत ०.२५ गुणांचे नकारात्मक गुण असतील.