ट्विटरच्या माध्यमातून ऍलन मस्क देणार सिटीझन जर्नालिझमला प्रोत्साहन !
नवी दिल्ली : अॅलन मस्क हे ट्विटरबाबत सातत्याने मोठे निर्णय घेत आहेत. नुकतीच 44 अब्ज डॉलर्समध्ये कंपनी ताब्यात घेतल्यानंतर मस्क यांनी ट्विटर ब्लूबाबत घेतलेल्या निर्णयाची जोरदार चर्चा आहे. दरम्यान, मस्क यांनी आता सिटीझन जर्नालिझम म्हणजेच नागरिक पत्रकारिता वाढविण्याबाबत ट्विट केले आहे.
ट्विटरचे नवीन बॉस अॅलन मस्क यांनी ट्विटर ताब्यात घेतल्यानंतर मोठे बदल करत खळबळ उडवून दिली आहे. शनिवारी त्यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, ट्विटर नागरिक पत्रकारितेला प्रोत्साहन देण्याचा उद्देशाने काम करत आहे. प्रसारमाध्यमांतील प्रस्थापित मंडळी या निर्णयाला अटकाव करण्याचा कसोशीने प्रयत्न करतील याची आपल्याला कल्पना असल्याचे त्यांनी नमूद केले.
त्याचवेळी, त्यांनी आणखी एका ट्विटमध्ये लिहिले की, मुख्य प्रवाहातील माध्यमे अजूनही वाढतील, परंतु जसजशी नागरिक पत्रकारिता वाढेल, तसतसे त्यांना अधिक अचूक बनावे लागेल. याचे कारण म्हणजे माहितीवरील त्यांची मक्तेदारी मोडीत निघेल.
पॅरोडी खात्यांबाबत मस्कचा मोठा निर्णय
प्रसिद्ध लोकांच्या नावाने बनावट ट्विटर हँडल चालवणाऱ्या लोकांना आता बायोसह नावात पॅरोडी लिहावे लागणार आहे, जेणेकरुन वापरकर्ता योग्य खाते सहज ओळखू शकेल. मस्क यांनी याबाबत ट्विट केले की, जो कोणी पॅरोडी ट्विटर अकाउंट चालवतो, त्यांना त्यांच्या बायोसह त्यांच्या नावावर पॅरोडी लिहावे लागेल.
आता प्रत्येक यूजर ट्विटरवर ब्लू टिक घेऊ शकणार
44 बिलियन डॉलर मध्ये ट्विटर विकत घेतल्यानंतर मस्कने ट्विटर ब्लू सुरू केला आहे. ज्यामध्ये प्रत्येकजण आठ डॉलर भरून ट्विटरची ब्लू टिक मिळवू शकतो. या सेवेला ट्विटरने ट्विटर ब्लू म्हटले आहे. ही सेवा अमेरिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासह इतर अनेक देशांमध्ये सुरू करण्यात आली आहे.