एसबीआयने गृहकर्जाच्या एयूएम मध्ये 6 ट्रिलियन रुपयांचा टप्पा ओलांडला
मुंबई: भारतातील सर्वात मोठी कर्ज देणारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) बुधवारी ( ता. 12 ) निवासी गृहकर्ज विभागात, ‘व्यवस्थापनाखालील मालमत्ता’ या कॅटेगरी (एयूएम) मध्ये 6 ट्रिलियन रुपयांचा टप्पा ओलांडला. अशी कामगिरी करणारी ती देशातील पहिली वित्तीय संस्था बनली आहे.
एसबीआय ने जानेवारी 2021 मध्ये व्यवस्थापनाखालील मालमत्ता’ या कॅटेगरी (एयूएम) मध्ये 5 ट्रिलियन रुपयांचा टप्पा ओलांडला होता. एसबीआय ने एका निवेदनात म्हटले आहे की, सध्या सुरू असलेल्या सणासुदीच्या काळात सर्व संभाव्य खरेदीदारांसाठी परवडणारे गृहकर्ज उपलब्द करून देण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.
सणासुदीचा एक भाग म्हणून, एसबीआय गृहकर्जावर 0.25 टक्के, टॉप-अप कर्जावर 0.15 टक्के आणि मालमत्तेवरील कर्जावर 0.30 टक्के सवलत देईल. 31 जानेवारी 2023 पर्यंतच्या गृहकर्जावरील प्रक्रिया शुल्क माफ करण्याची घोषणा करून बँकेने ग्राहकांना दिलासा दिला आहे.
विविध विभागांमधील खरेदीदारांच्या विविध गरजा लक्षात घेऊन बँकेने खास ऑफर तयार केल्या आहेत. ज्या ग्राहकांना घर घेण्याचे स्वप्न आहे त्यांना परवडणारी घरे सोयीस्करपणे उपलब्ध करून देण्यासाठी एसबीआय सातत्याने प्रयत्नशील आहे, असे बँकेने म्हटले आहे. एसबीआय गृहवित्तमध्ये अग्रेसर असल्याने, प्रत्येक भारतीयाचे स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बँक कटिबद्ध आहे. आमच्या 28 लाखाहून अधिक कुटुंबांचा समावेश असलेल्या आमच्या ग्राहकांचे आम्ही अत्यंत आभारी आहोत, ज्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि आम्हाला या प्रवासात भागीदार होण्यासाठी निवडले,” असे एसबीआय चे अध्यक्ष दिनेश खारा यांनी एका निवेदनात म्हटले आहे. आम्ही राष्ट्र उभारणीत भागीदार होण्यासाठी वचनबद्ध आहोत आणि ‘सर्वांसाठी घरे’ या आपल्या पंतप्रधानांचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे खारा म्हणाले.
एसबीआय ने प्रथमच होम लोन विभागामध्ये अनन्य ऑफरची मालिका सुरू केली आहे. नवीन गृहकर्ज खरेदीदारांसाठी तसेच टेकओव्हरसाठी व्याजदर 8.40 टक्क्यांपासून सुरू होतो आणि फर्निशिंग/नूतनीकरण/होम मेकओव्हरसाठी टॉप-अप कर्ज 8.80 टक्क्यांपासून सुरू होते.