उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथैः।
आज विजयादशमी निमित्त “उद्योग वार्ता” हे न्युज पोर्टल प्रथमच आपल्या हाती देताना आम्हाला मनोमन आनंद होत आहे. मराठी पत्रकारितेतील दीर्घ अनुभवातून असे लक्षात आले की मराठी माध्यमात उद्योग-व्यवसाय, आणि आर्थिक विषयाशी निगडित स्वतंत्र नियतकालिकांची तुलनेने काहीशी कमतरता आहे. याउलट इतर भाषिक माध्यमात, या विषयांची स्वतंत्र नियतकालिके आणि त्यांच्या ऑनलाइन डिजिटल आवृत्त्या देखील प्रसिद्ध होतात. मराठी वाचकांची नेमकी ही उणीव भरून काढण्यासाठी “उद्योग वार्ता” हे मराठी बातम्यांचे ऑनलाइन पोर्टल सुरू करण्याचा विचार पुढे आला. ही वेबसाईट उद्योजक, व्यावसायिक, विद्यार्थी, आणि नवनिर्माण करू इच्छिणाऱ्या उदयोन्मुख युवा पिढीच्या पसंतीस उतरेल याची आम्हाला खात्री आहे. यात वाचकांना उद्योग, व्यवसाय, तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल, गॅझेट्स, शेअर बाजार, आधुनिक जीवनशैली, नोकरी-स्वयंरोजगार आणि अर्थ विश्वातील घडामोडींचे प्रतिबिंब दिसेल. शिवाय यशस्वी उद्योजकांचे उद्योजकीय मनोगत आणि प्रथितयश व्यावसायिकांच्या प्रेरणादायी यशकथा देखील वाचायला मिळतील.
पुढील दशक हे युवा पिढीचे असणार आहे. त्यातच अभियांत्रिकी-व्यवस्थापनासह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने दरवर्षी बाहेर पडतात. नोकरी अथवा उद्योगांमधे त्यांना यशस्वी होण्यासाठी त्यांच्याकडे आणखी काही कौशल्ये हवी असतात. त्यासाठी “उद्योग वार्ता” हे पोर्टल विद्यार्थी, व्यावसायिक आणि उद्योगांमधे एक प्रकारे संवाद पुलाची उभारणी करेल याची आम्हाला खात्री वाटते. सध्याच्या आर्थिक आघाडीवरील अनिश्चिततेच्या काळात, आर्थिक स्वावलंबन ही प्रत्येकाचीच प्राथमिक आवश्यकता आहे. तसे पाहता महाराष्ट्र हे औद्योगिक दृष्ट्या पुढारलेले राज्य. याच उद्योगी वातावरणात तांत्रिक सक्षमता आणि कौशल्य असणारी एक उद्योगी पिढी इथे निर्माण झाली आहे. ही नवीन तरुण पिढी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा उद्योग उभारण्याची धडाडी अंगी बाळगून आहे. युवकांनो, तुमच्याकडे असलेल्या कल्पना हेच तुमचे मोठे भांडवल आहे. त्यांचा आपल्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने वापर झाला पाहिजे. विशेषतः उद्योग, व्यवसाय आणि नोकरी या तिन्हींमध्ये आत्मविश्वासाने सामोरे जाताना जगाचे ज्ञान आणि भान देणारी योग्य वाट पकडली पाहिजे. “उद्योग वार्ता” त्यासाठी एक वाटाड्या म्हणून काम करेल याची आम्हाला खात्री वाटते.