सुझलॉन एनर्जीचे संस्थापक तुलसी तांती यांचे निधन; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक.
अहमदाबाद:- भारतातील ‘विंड मॅन’ म्हणून प्रसिद्ध असलेले सुझलॉन एनर्जीचे संस्थापक तुलसी तांती यांचे शनिवारी वयाच्या 64 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
रविवारी माहिती देताना कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, तांती यांना शनिवारी संध्याकाळी पुणे ते अहमदाबाद प्रवासा दरम्यान हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगी निधी आणि मुलगा प्रणव असा परिवार आहे. 1958 मध्ये गुजरातमधील राजकोट येथे जन्मलेले तांती हे 1995 मध्ये स्थापन केलेल्या सुझलॉन एनर्जीच्या प्रवर्तकांपैकी एक होते.
ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सुझलॉन एनर्जीची स्थापना करण्यात आली.
तंटी यांचा 1995 मध्ये कापडाचा व्यवसाय होता. मात्र विजेच्या तुटवड्यामुळे त्यांना उत्पादनात घट येत होती. त्यानंतर त्यांनी 1995 मध्ये कापड कंपनीच्या ऊर्जेची गरज भागवण्यासाठी पवन ऊर्जा निर्मितीमध्ये पाऊल टाकले आणि सुझलॉन एनर्जीची स्थापना केली. पुढे 2001 मध्ये त्यांनी कापडाचा व्यवसाय विकून टाकला. 2003 मध्ये, सुझलॉनला दक्षिण-पश्चिम मिनेसोटामध्ये 24 टर्बाइनचा पुरवठा करण्यासाठी डॅनमार अँड असोसिएट्सकडून यूएसए मध्ये पहिली ऑर्डर मिळाली. सध्या सुझलॉन एनर्जीचे मार्केट कॅप 8,535.90 कोटी रुपये आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुझलान एनर्जीने भारताव्यतिरिक्त युरोपीय बाजारपेठांमध्ये आपले अस्तित्व प्रस्थापित केले. कंपनीची जर्मनी, नेदरलँड्स, डेन्मार्क येथेही R&D केंद्रे आहेत.
तुलसी तंतीच्या निधनाबद्दल पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक.
पीएम मोदींनीही तुलसी तांतीच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. मोदी म्हणाले की, तुलसी तांती हे एक प्रमुख व्यावसायिक नेते होते, ज्यांनी भारताच्या आर्थिक प्रगतीत मोठे योगदान दिले. त्यांनी शाश्वत विकासासाठी आपल्या देशाच्या प्रयत्नांना बळ दिले. त्यांच्या अकाली निधनाने मला दु:ख झाले आहे.